आता,

वाफळणाऱ्या चहासोबत newspaper हाती येत नाही पण

आठवड्याची रद्दी काढलीस ना..?

यावर लक्ष ठेवलं जातं.

आता,

नवीन काही वाचलं का गं

विचारले जात नाही पण

होमवर्क चेक केलाय ना

याची मात्र पुन्हा पुन्हा खात्री केली जाते

आता ,

मी विचारांनी साम्यवादी की समाजवादी

याने फरक पडत नाही पण डब्याला भाजी कोणती? याला मात्र फार महत्त्व असते.

आता ,

कधी बाहेर गेल्यावर

स्वतःसाठी सुद्धा काहीतरी घेत जा असं नसतंच

पण जरा काटकसरही करत जा

असा टोला नक्की लगावलेला असतो.

आता,

माझ्यातील स्वप्नाळू महत्वकांक्षी मुलीकडे

ढुंकूनसुद्धा पाहिलं जात नाही

पण पाहिलं जातं ते

ती घरीच तर असते या स्टेटस कडे

© कोमल कदम .

अवनी..

अवनी तू वाघ म्हणुन जन्माला आलीस हाच तुझा दोष.!!माणसाच्या जन्माला आली असतीस तर तू 14 बळीच काय मोठ-मोठी जळीत कांड दंगली सहज पचविल असत.!!आम्हा माणसांची पचनशक्ती आहेच तितकी चांगली.

माणूस असतीस तर तुला माणसांच्या जगातले सभ्य कायदे लागले असते मोठमोठ्या रथी-महारथींनी तुझं वकीलपत्र घेतलं असतं.अग कदाचित आमचं सर्वोच्च न्यायालय पार अगदी मध्यरात्रीही उघडलंच असतं फक्त तुझ्यासाठी..!!

खरंच तू माणूस म्हणून जन्माला यायला हवी होतीस, जास्त काही झालं नसतं ट्रायल तितकी चालली असती, वकिलांच्या बुद्धीचा किस पडला असता..आणि तुझे बछडे? ते तर भावी आमदार खासदार सुद्धा झाले असते!! खरच तू माणूस हवी होतीस .

ट्रायल संपेपर्यंत एक दोन निवडणुका तीन चार पेट्रोल पंप सगळं झालं असतं आणि शिक्षा काय ग झाली असती फार फार तर जन्मठेप..!!फाशीबिशी दिली तर मानवाधिकारवाले पाठ सोडत नाहीत ना सरकारची… शिवाय निवडणुका तोंडावर असताना सरकार तेवढी रिस्क घेत नाही..

खरंच अवनी तू माणूस हवी होतीस तुलाही बघता आलं असतं की सभ्यतेच्या मुखवट्यामागच जनावर!!

-कोमल कदम

आठवतं का रे तुला.

आठवतं का रे तुला..?

भेटलो होतो एका संध्याकाळी

त्या शेजारच्याच आळीत

लगबग होती साऱ्यांची

पण आपली मात्र ओढ निराळी

अंधारलेल्या वाटेवर

काजव्यांची लुकलुक होती

घाबरलेल्या मनाला

तुझ्या अस्तित्वाची साथ होती

आठवतं का रे तुला..?

भेटलो होतो एका संध्याकाळी

ओथंबलेल्या अश्रूंना

पापण्यांची भिंत होती

उसळलेल्या भावनांना

समाजाची बंधन होती

मोहरणार्या स्पर्शाला

लज्जेची किनार होती

कुठेतरी एक अनामिक भीती तेवढी होती

आठवतं का रे तुला..?

भेटलो होतो एका संध्याकाळी

एकमेकांच्या डोळ्यांत आकंठ बुडालेलो

स्वप्नांच्या समुद्रात विहारलेलो

धुंद करणाऱ्या त्या क्षणी

जणू अस्तित्वच विसरलेलो

आठवतं का रे तुला..?

भेटलो होतो एका संध्याकाळी

एकमेकांना दूर सारताना

नजर लपवणारी

चेहऱ्यावर हसू आणण्याची

केविलवाणी धडपड करणारी

पुन्हा कधीच भेटणार नाही

सतत मनावर बिंबवणारी

वाट सोडतानाही

एकमेकांचीच आस असणारी

आठवतं का रे तुला..?

भेटलो होतो अशाच एका संध्याकाळी..!!

©-कोमल कदम

अनु मावशी..!

2nd year ला असताना मला आणि ज्योतीला सकाळी जाग यायची ती “पोरीनो चपला नीट ठेवता येत नाही का गं?” या ‘अनु मावशीच्या’ ओरडण्याने..!!!खरंतर हे रोजचच होत, ज्योती मग कानावर उशी ठेवून झोपून जायची त्यामुळे बऱ्याचदा मलाच दरवाजा उघडावा लागायचा पण माझ्या पेंगुळलेल्या चेहर्‍याकडे बघुन सुद्धा तिचं ओरडणं काही थांबायचं नाही…कसतरी चपल्ल नीट करून मी पुन्हा बेडवर यायची तोवर तिच “आज कॉलेज नाही का?”..सुरू व्हायचं मग मात्र ज्योतीलाही उठाव लागायचं..अशी होती आमची अनु मावशी .अजूनही तशीच आहे .फरक इतकाच आहे तेव्हा आम्ही पहिल्या मजल्यावर राहायचो आता चौथ्या मजल्यावर राहतो..अनु मावशी आमच्या हॉस्टेलचा पहिला मजला साफ करते. पण या मजल्यांच अंतर मात्र आमच्यात कधी आलं नाही! “तिचं वय फार नाहीय..फारफारतर ‘साठी’ओलांडली असेल”. ते यासाठी कारण तुम्ही तिच्या चेहऱ्याकडे पाहिले तर तिच्या हसर्‍या चेहर्‍याने तिचे वय लपून जात.नऊवारी चापून चोपून नेसणारी, कपाळावर कुंकू ,हातांत हिरवा चुडा असणारी आमची अनु मावशी! “तिने आम्हाला मनापासून तिच्या लेकी मानल, आणि आम्ही तिला आमची मावशी!” रोज सकाळी मेसमधे जाताना भेटणारी,गळाभेट घेणारी, आणि एकटेच दिसलो तर सगळ्यांची विचारपूस करणारी, तर कधी shorts घातले तर पाय उघडे दिसतात म्हणून हक्काने ओरडणारी..!! पण इतकं वय झालय तरी ती थकली असे वाटत नाही मन जे तरुण आहे तिचं.घरापासून दूर राहणाऱ्या आम्ही मुली अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या आणि काही तर विदेशीही. पण या सगळ्यांनाच ती आपल्या लेकी समजते त्यामुळेच की काय जसं आमचे लाड करण्याला ती तिचा हक्क समजते तसंच ओरडण्यालाही …वयामुळे अनु मावशीचा कणा झुकत चालला असेल पण तिची मान मात्र झुकली नाहीय…!!

©-कोमल कदम

आशिष….

तुमच्यापैकी कोणी दादरच्या ‘जगदिश बुक डेपोमध्ये’ गेलं आहे का?मुंबईत शिकणाऱ्या बऱ्याच विद्यार्थ्यांचा संपर्क कधी ना कधी जगदीशशी नक्कीच येतो ,आणि जर तुम्ही तिथे गेला असाल तर तुम्हाला ‘आशिष’ माहीत नसेल असे होऊ शकत नाही!तोच तो तेवीस- चोवीस वर्षांचा तरुण जो खूप सार्‍या पुस्तकांच्या गराड्यात बसून असतो .त्याच्यासमोर जाऊन तुम्ही फक्त तुमचा कोर्स आणि सेमिस्टर सांगायचा,आणि मग तो एखाद्या जादूगारासारखा तुमच्या सेमिस्टरची सगळी पुस्तकं तुमच्या समोर आणून ठेवतो….आता तुम्ही म्हणाल यात काय आश्चर्य?पुस्तकांच्या दुकानातल्या प्रत्येक विक्रेत्याला ती नावं माहीत असतातच की!बरोबर आहे .माहित असतात पण हा आशिष थोडा वेगळा आहे.म्हणूनच कदाचित तिथे जाणाऱ्या प्रत्येकाच्या तो लक्षात राहतो.पुस्तकांचा विक्रेता कदाचित तुमच्या सेमिस्टरची सगळी पुस्तकं सांगू शकतो.पण आशिष तुम्ही कुठला विषय ऑप्शनला घेणार ते पण सांगू शकतो. एकदा माझी मैत्रीण त्याच्याकडे पुस्तक घ्यायला गेली तिचा ऑप्शनल विषय ठरला नव्हता तरी याने ऑप्शनला असलेल्या तीन विषयांपैकी ‘क्रिमिनोलॉजी’ तिला दिला तिने ‘नको ‘ म्हटलं तर हा म्हणतो कसा “भाई यह क्रिमिनोलॉजी का बुक साइड में कर देना मैडम बाद में आकर यही लेकर जाएगी!” आणि झालंही तसंच !!..तिने शेवटी ‘क्रिमिनोलॉजी’ घेतलं होतं. तुम्ही म्हणाल कदाचित हा त्याच्या पुस्तक विक्रीचा अंदाज असू शकतो?पण अशी कितीतरी पुस्तकं तो विकत असतो… law, engineering, science ,Arts, Commerce, MPSC, UPSC,काही ही असुद्यात! त्याला ते सगळंच माहीत असतं…म्हणूनच जर तुम्ही जगदीश मध्ये गेलात आणि तुमची गाठ आशिषशी झाली नाही असे होऊच शकत नाही…त्याने किती पुस्तकं वाचली आहेत ?किंवा त्याच किती शिक्षण झालं आहे ?’माहित नाही’. पण एक मात्र नक्की “तो माणसं वाचायला नक्कीच शिकला असेल ..त्याच्या आयुष्याच्या शाळेत…!!!”

– कोमल कदम

रुक्सार…

law च्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये मी ‘टीच फॉर इंडिया’ साठी काम करायचे.खुप छान वाटायचं लहान मुलांना शिकवायला.तिथेच मला रूक्सार भेटली,पाच – सहा वर्षांची खूप गोड मुलगी होती.मोहम्मद या तीच्या मोठ्या भावासोबत यायची, मोहम्मद मस्तीखोर वात्रट आणि रूक्सार तितकीच शांत अगदी दोन टोकं! हा मोहम्मद मला ‘दिदी ये ऐसा क्यो है?वैसा क्यो नहीं?’असले प्रश्न विचारून नुसता हैराण करायचा आणि रूक्सार? तिला फक्त लाड करून घ्यायचे असायचे! आठवड्यातले दोन दिवस मी ‘टीच फॉर इंडिया’ साठी द्यायचे पण या दोन दिवसात आमच्या तिघांची फार मस्ती व्हायची ,पण का कोण जाणे त्या सहा वर्षाच्या रुक्सार मध्ये अकाली प्रौढत्व आलंय की काय ?असं मला उगाचच वाटत राहायचं. तिच्या वागण्यातून तसं दिसून यायच देखील. मग मात्र मला ती फारच शांत वाटू लागली होती….एकदिवस आली आणि माझ्या मांडीवर बसून माझ्या गालांशी खेळत म्हणाली,”दिदी क्या आपका कोई घर है?”मी हो म्हणताच तिचे डोळे अजून ऊदास झाले ‘क्यू?क्या हुआ?’-मी विचारलं तर माझा चेहरा हातात घेत म्हणाली “आपको पता है मेरा कोई घर नहीं है ; क्या कभी आपके तरह मेरा भी घर होगा?”….”क्यो नहीं..”- मी म्हटलं खरं पण तिच्या नजरेत मला अविश्वासच दिसला.काही अंशी तो रास्तही होता आपण अनाथ असल्याची जाणीव रूक्सारला होत होती आणि तिच जाणीव मला माझ्या नाकर्तेपणाची साक्ष देत होती! मी एका छोट्या मुलीला आठवड्याच्या दोन दिवसांपेक्षा जास्त काही देऊ शकत नव्हते, आणि ते चिमुकले डोळे मात्र माझ्याकडे आशेने बघत होते. तेव्हा माझ्याकडे तिच्या प्रश्नाचे योग्य उत्तर नव्हतं आज उत्तर आहे रुक्सार नाही….कारण तिचा हात मीच तर सोडला होता, माझ्याही नकळत..कदाचित माझ्या खोट्या समाजप्रेमामध्ये! आज रुक्सार भेटली असती तर निदान तिला सांगता आल असतं की आता फक्त N.S.S.चे १२० तास पूर्ण करण्याच उद्दीष्ट नाहीये ग.. तुझ्यासारख्या एखाद्या रुक्सारसाठी आज फक्त माझ्या मनाचे नाही तर घराचे दरवाजे देखील उघडे आहेत.

©– कोमल कदम

ती…

विरार फास्ट पकडायला अगदी जिवावर येतं माझ्या ..गर्दीच गर्दी..! जीव अगदी घुसमटून जातो.त्यात फोर्थ सीट मिळेल एवढे काही माझं भाग्य नाही त्यामुळे माझ्या नशिबी ट्रेनचे धक्के खाण्याशिवाय पर्याय नव्हता.वर हे छोटे-मोठे विक्रेते पण घुसतात ,काय करणार बायकांना हौस असते ना खरेदीची…!त्याच गर्दीत मला ‘ती’ दिसली लांबून काही फार नीट दिसले नाही पण कदाचित गरोदर असावी , हातात तऱ्हेतऱ्हेच्या ज्वेलरीचे बॉक्स होते .तिची तशी अवस्था पाहून बायकांना तिची किव येणं साहजिकच होतं. आमच्या संपदा एवढीच असावी अठरा एकोणीस वर्षांची. नाकी-डोळी नीटस ,सावळी पण आकर्षक चेहऱ्याची! आठवा महिना चालू असूनही बिचारी विक्री करत होती…नेमका तितक्यात तिच्या हातातून एक बॉक्स खाली पडला आणि ताssड करुन एक तिच्या कानशिलात बसली होती .गुजराती मिश्रित भाषेत एक मध्यमवयीन बाई तिला बोलू लागली ‘एक काम होत नाही नीट तुझ्याने तुझा बाप भरुन देणार का ग?बहुधा ..ती तिची सासू असावी .तिच्या ओरडण्याने ती पोरं मात्र फार भेदरून गेली होती पण, फार ताकद होती तिच्यात गच्च भरलेल्या डोळ्यांतून पाण्याचा एक थेंब खाली पडला नव्हता.’ नको मारु तिला अवस्था तरी बघा तिची कधीही बाळंत होईल आणि तुम्ही काय हात उगारताय?’ एक बाई म्हणाली ..”होऊ द्या की बाळंत मी सूई धागा घेऊनच चालते त्यात काय एवढं एक टाकाच तर, घालायचा आहे” अगदी सहज बोलून गेली होती ती बाळंतपणाची व्याख्या..सगळे मात्र तोंड उघडं टाकून तिच्याकडे बघत होते तिचा मुद्दा काही चुकीचा नव्हता पण सुखवस्तू कुटुंबातल्या बायकांना मात्र तो अघोरी प्रकार नक्कीच वाटला असावा.नऊ महिने माहेर सासरच्यांकडून तिला प्रेम मिळालं होतं की नाही ?माहीत नाही. पण आराम मात्र नक्कीच तिच्या वाटायला नसावा ! तरीही मला ती कणखर स्त्री वाटली, स्वाभिमान जो जपत होती ..!आणि तिचं बाळ ते या जगात आल्यावर त्याला कल्पनाही नसेल त्याच्या आईच्या संघर्षाची कारण एक स्त्री कणखर जरी असली तरी आई मात्र प्रेमळच असते ना ती स्टेशनवर उतरून लागली तरी तिची पाठमोरी आकृती काही माझी पाठ सोडत नव्हती

©– कोमल कदम

तो + ती = ते ….

आज खूप दिवसांनी मी आणि प्रणव भेटलो होतो नेहमी सारखं मरीन ड्राईव्ह वर बसून आमच्या गप्पा रंगल्या होत्या तितक्यात तिथे ‘ते’ आले .. “क्या हिरो पैसा दे ना..” म्हणत तिने पैसे मागितले आणि मी देखील तिला पैसे देण्यासाठी पर्स उघडलीच
होती की , मागुन “दो लफ्जों की है दिल की कहानी” ऐकू आलं वळून पाहिले तर तिच गात होती.माझ्या
विस्फारलेल्या डोळ्यांत पाहत म्हणाली “आशा भोसले का है ;सुना नहीं क्या?तुम आजकल के बच्चे… आयटम साँग छोड के कुछ और भी सुनते हो क्या ?” म्हणत माझ्या मुळातच कमी असलेल्या संगीत ज्ञानावर तिने ताशेरे ओढले.त्यामुळेच की काय पण तिला जाणून घेण्याची इच्छा वाढली होती.’आप गाओ ना हम रेकॉर्ड करते है’ म्हणत मी विनवल तर मला रेकॉर्ड करायला आवडत नाही म्हणाली पण मला तिच्याशी बोलायच होतं त्यामुळे “बैठो ना हमारे साथ बाते करते है” म्हणत मी शेवटचा प्रयत्न केला तर चक्क ऐकली आणि बोलायला लागली …तशी ती मुळची दार्जिलिंग ची .वडील डिफेन्स मध्ये मोठ्या पदावर होते.. एका उच्च माध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली केंद्रीय विद्यालय मध्ये तिच शिक्षण झालेलं. novels वाचायला आवडतं म्हणून” बेनेट,अगाथा
ख्रिस्ती,इरीस , विल्यम गोल्डींग ,बर्नोड श्वा , शेक्सपिअर” वाचून झालेले .. अस्खलित इंग्रजी बोलणारी बी.ए.लिटरेचर (इंग्लिश) शिकलेली..इतकं सगळं असूनही समाज आणि नातेवाईकांनी
झिडकारलेली ती ! का ? तर…निव्वळ तिच्या तृतीय पंथिय असल्यामुळे !ती जरी पैसे मागत असली तरी खरी लाचार मीच होते ‘मी एक मुलगी म्हणून जन्माला आले ;यात माझा काही पराक्रम नव्हता आणि तिच्या तृतीय पंथिय असण्यात तिचा काहीच दोष नव्हता..याची जाणीव करून दिल्याबद्दल
धन्यवाद…!!! तिचं नावं?अरे हो ते तर तिने सांगितलंच नाही खूप दिवसांनी मन मोकळं झालं होतं तिचं पण मला मात्र अस्वस्थ करुन गेली……
©– कोमल कदम

नाती – ऊरली-सुरलेली..?

downloadfile ( छायाचित्र – गुुुगलवरुन साभार )

काल क्लास ला जायला मला जरा उशीरच झाला होता.१२:३०ची बोरीवली फास्ट मिळाली म्हणून ठीक नाहीतर अजून उशीर झाला असता ,तरी देखील विन्डो सीट मिळाली हे काय कमी होत?असाच आनंद मला माझ्या समोर बसलेल्या एका आजीच्या डोळ्यांत दिसला.माझी आजी पण तशीच होती दिसायला गोरीपान गोल चेहरा, आणि बोलक्या डोळ्यांची !! त्यामुळे तिला न्याहळण्याचा मोह काही आवरता येत नव्हता…त्या आजी मध्ये एक लहान मुलगी लपलेली होती सारख्या खिडकीतून बाहेर बघत होत्या.. धावणारी माणसं बघत गालात हसत होत्या.मध्येच हातातली पिशवी उघडून पाहत होत्या काय होतं त्या पिशवीत माहीत नाही पण काही तरी फार महत्त्वाच असावं कारण ते बघून त्यांना आनंद होतं होता..”दादी बैंगन लो ना एकदम ताजा है” म्हणत एक भाजीवाली तिथं आली.. तिच्या हातातल्या भाजी कडे बघत आजीचे डोळे भरून आले होते.. नही चाहीए ..म्हणत माझ्या कडे वळल्या म्हणाल्या “अब तरकारी लेकर क्या करूंगी? आश्रम में किधर मिलता है खाना बनाने को?आज मेरे नातिन का जन्मदिन है उसको तोहफा लेकर जा रही हू .” हातातल्या पिशवी कडे पाहत म्हणाली.नातेवाईक असूनही व्रुद्धा आश्रमात राहणारी आजी ला तिचे नातेवाईक विसरले होते पण ती मात्र आजी म्हणून तिची जबाबदारी विसरली नव्हती.. दुरावलेल्या नात्यांना जवळ आणत होती.त्या दोन मिनिटांच्या संवादात आजी मला जीवनाचं वास्तव सांगून गेल्या होत्या… मला अबोल ठेवत !

   ©– कोमल कदम